प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध: महाराष्ट्र अंनिस

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र निषेध: महाराष्ट्र अंनिस 
पुरोगामी चळवळीचे अभ्यासू कार्यकर्ते आणि संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे शिवधर्म फाऊंडेशन या सनातनी प्रवृत्तीच्या संघटनेच्या लोकांकडून शाई फासत धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तीव्र निषेध करीत आहे आणि या प्रकरणी तत्काळ चौकशी करून गुन्हेगारांना कठोर शासन करण्याची मागणी करीत आहे.
सामाजिक परिवर्तनासाठी आयुष्य वेचणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमागचे सूत्रधार पकडण्यात यंत्रणांना अजूनही यश आलेले नसल्याने या प्रवृत्तींना कायद्याचे भय वाटेनासे झाले आहे. म्हणूनच पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्यांवर ते असे उघडपणे हल्ले करण्यास धजावत आहेत हे गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यावरून दिसून येते. या हल्ल्यासाठी हल्लेखोरांनी दिलेले कारण अत्यंत तकलादू असून कायद्याच्या राज्यात कोणत्याही कारणाने असा हल्ला करणे हे निषेधार्हच ठरते.
अत्यंत खेदाची बाब म्हणजे जनसुरक्षा विधेयक विधिमंडळात मंजूर होऊन तीन दिवसही उलटले नाहीत तोच गायकवाड यांच्यावर हल्ला झालेला आहे. या हल्ल्यामार्फत सनातनी प्रवृत्तीने पुन्हा एकदा हा संदेश दिला आहे की ते या नवीन कायद्याला देखील जुमानत नाहीत. हे संत, सुधारकांचा वारसा सांगणार्या महाराष्ट्राला भूषणावह नाही. तरी, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणार्या हल्लेखोरांना तत्काळ अटक करून हल्ल्यामागील सूत्रधारांचा शोध घेऊन यांच्या विरुद्ध कसलाही पक्षपात न करता कठोर कायदेशीर कारवाई करून कायद्यासमोर सर्व समान आहेत हे त्यांना आणि जगाला दाखवून द्यावे असे आवाहन महाराष्ट्र अंनिस करीत आहे.
महा. अं.नि. स.,गजेंद्र सुरकार राज्य प्रधान सचिव महा. अनिस महाराष्ट्र, प्रफुल्ल कुकडे जिल्हा कार्याध्यक्ष महा. अनिस अमरावती, जिल्हा,सुभाष गौरखेडे महा. अनिस अम.,दिगंबर मेश्राम अम. शहर कार्याध्यक्ष, दिलीप लाडे बडनेरा शहर कार्याध्यक्ष, वसीम राज, अफसर भाई, रेहमत शहा, महादेव मेश्राम, कीर्तिका सयामे, आशिष देशमुख, विजय डवरे विजया करोले, भूमिका पहूरकर सर्व विभाग कार्यवाह व साथी महा. अनिस अमरावती.




